Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेत धनंजय मुंडे टोळ्या चालवणारे नेते असल्याचा आरोप केला आहे. तसेच, राज्यात दंगली घडवण्याचा त्यांचा डाव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जालना: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बीड सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडला सात दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली असून 22 जानेवारीपर्यंत पीसीआर मंजूर करण्यात आली आहे. परिणामी, मराठवाड्यातील बीड, परळीसह इतर भागांत हे प्रकरण अधिकच तापले आहे. विरोधी पक्ष आणि भाजप नेते याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेत धनंजय मुंडे यांना टोळ्या चालवणारे नेते म्हटले आहे. तसेच, त्यांना राज्यात जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
“मुख्यमंत्री साहेब, याला थांबवा…”
जरांगे म्हणाले की, “या टोळीकडून त्रास झाला तर आम्ही सहन करणार नाही. या प्रकरणात आरोपी वाचवण्यासाठी काही नेत्यांनी फोन केले असतील. मात्र, सर्व आरोपी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना आरोपपत्रात समाविष्ट करणे गरजेचे आहे. धनंजय मुंडेची टोळी नष्ट झाली पाहिजे. जातीयवादी आणि दंगली घडवणारी मोठी टोळी आहे.”
“सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा”
जरांगे पुढे म्हणाले की, “पडद्यामागून धनंजय मुंडे यांच्यासाठी वाल्मिक कराडने पैसा जमवला आहे. ही टोळी जातीयवाद पसरवत आहे. आरोपींच्या पाठिशी असलेल्या नेत्यांवरही कारवाई झाली पाहिजे. खंडणी मागणाऱ्या आरोपींना शोधा आणि त्यांची नार्को टेस्ट घ्या,” अशी मागणी त्यांनी केली.
जरांगे यांनी दिलेला हा इशारा राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.